मुंबई, दि.१२ : अजय मगरे
कोविड काळात सुरू झालेल्या मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून राज्यातील सर्व विधवा, एकल व परित्यक्त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
या योजनेतून महिलांना मृत्यू दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, पेन्शन, रेशनकार्ड, निवारा अशा शासकीय योजनांचे लाभ तसेच आवश्यक कागदपत्रे शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जिल्हास्तरावर शिबिरे व मेळावे घेऊन महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी ही योजना राबविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांसाठी संरक्षण व समुपदेशन देणारी ‘वन स्टॉप सेंटर’ सेवा कार्यरत …..
महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराविरुद्ध त्वरित मदत व समुपदेशन देण्यासाठी राज्यभर ‘वन स्टॉप सेंटर’ कार्यरत असून सध्या ३६ जिल्ह्यांमध्ये ५५ केंद्रे सुरू आहेत.
या केंद्रांत पीडित महिलांना कायदेशीर सल्ला, वैद्यकीय साहाय्य, पोलिस मदत, मानसोपचार, तात्पुरता निवारा व पुनर्वसनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली दिला जातो. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ७,०६३ महिलांना या केंद्रांमधून सहाय्य मिळाले आहे.
नवीन केंद्रे नाशिक, पुणे, नागपूर, जळगाव, ठाणे आदी जिल्ह्यांत सुरू झाली असून, उर्वरित जिल्ह्यांत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली.
महिला लोकशाही दिन १५ सप्टेंबरला….
समस्याग्रस्त महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत महिला लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई शहरातील जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार असून, तक्रारींसाठी वरळी येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.




















