ठाणे, दि.१२ : अजय मगरे
रस्त्यावर लढणाऱ्या, आक्रमक शैलीत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या आणि काँग्रेसप्रती अखंड निष्ठा राखणाऱ्या राहुल पिंगळे यांच्यावर अखेर काँग्रेस नेतृत्वाने विश्वास दाखवला आहे. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांची २१४ पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.
ओबीसी विभाग अध्यक्ष म्हणून त्यांनी ठाण्यात रॅली, मोर्चे व आंदोलनांतून पक्षाला नवे बळ दिले होते. सध्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून ते माध्यमांतून काँग्रेसची ठाम बाजू मांडत असून, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा समन्वयक म्हणून त्यांनी ठसा उमटवला होता.
प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने पिंगळे यांचे नियुक्तीपत्र जारी झाले असून, या नव्या जबाबदारीमुळे आता त्यांच्यावर पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात काँग्रेसची संघटना अधिक भक्कम करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
या नियुक्तीमुळे ठाणे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.




















