एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
ठाणे, दि.9.( अजय मगरे)
ठाणे | ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकमान्य नगर–सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत लोकमान्य नगर बस डेपोसमोर असलेल्या एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावर सुरू असल्याचा आरोप असलेल्या अनधिकृत रिक्षा पार्किंग तसेच दर मंगळवारी रस्त्यालगत भरवण्यात येणाऱ्या आठवडी बाजारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर युवा अध्यक्ष पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांनी लोकमान्य नगर–सावरकर नगर प्रभाग समितीचे आयुक्त श्री. बनसोडे यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
खरात यांच्या तक्रारीनुसार, एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून अनधिकृतपणे रिक्षा पार्किंग करण्यात येत आहे. या ठिकाणी असामाजिक प्रवृत्तींचा वावर वाढल्याचा तसेच चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
दर मंगळवारी भरवण्यात येणाऱ्या आठवडी बाजारामुळे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी होत असल्याचेही खरात यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकाराची महापालिका प्रशासनाने पाहणी करून अनधिकृत रिक्षा पार्किंग आणि आठवडी बाजारावर नियमानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी साईनाथ खरात यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास नागरिकांच्या प्रश्नांसाठी उपोषण करण्याचा इशाराही खरात यांनी दिला आहे. त्यामुळे या तक्रारीनंतर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















