चितळसर–मानपाडा योजनेतील विजेत्यांची मागणी;
“खाजगी बिल्डरपेक्षा म्हाडा महाग” असा आरोप
मुंबई, दि.१३ : अजय मगरे
म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत गेल्या महिन्यात विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत एकूण ५,३६२ घरांची लॉटरी काढण्यात आली. मात्र, या लॉटरीतील ठाण्यातील चितळसर–मानपाडा गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किंमती अवास्तव असून त्या खाजगी बिल्डरांच्या प्रकल्पांपेक्षाही जास्त आहेत, असा गंभीर आरोप विजेत्या अर्जदारांकडून करण्यात आला आहे. घरांच्या किंमतीत कपात करण्याची मागणी त्यांनी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

विजेत्यांनी सांगितले की, म्हाडाच्या जाहिरातीत प्रकल्पानुसार घरांच्या किंमती नमूद करण्यात आल्या होत्या. मात्र, चितळसर–मानपाडा योजनेतील सुमारे ९३८ घरांचे दर बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
उदाहरणार्थ, या परिसरातील ‘महावीर स्क्वेअर’ या खाजगी प्रकल्पात ४७० चौरस फूट घराची किंमत प्रति चौरस फूट ₹१६,५०४ (कारपार्किंग आणि क्लब हाउससह) आहे, तर ‘युनिक व्हिस्टा’ प्रकल्पातील ४४० चौरस फूट घराची किंमत प्रति चौरस फूट ₹१७,३७० इतकी आहे.
त्याउलट म्हाडाच्या चितळसर–मानपाडा योजनेतील घरांचे दर या दोन्ही प्रकल्पांपेक्षा अधिक ठरल्याने विजेते संतप्त झाले आहेत. “सामान्य नागरिकांसाठी स्वस्त घरांची संकल्पना असलेल्या म्हाडाकडूनच महागड्या दरात घरे विकली जाणे हा अन्याय आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक विजेत्यांनी दिली आहे.
विजेत्यांनी म्हाडा प्रशासनाला लेखी निवेदन देत, “म्हाडाने घरांच्या किंमतींचा पुनर्विचार करून दर वाजवी करावेत,” अशी मागणी केली असून या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा केली आहे.
या विषयी कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ विशाल राठोड म्हणाले “सर्व मागण्यांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल”




















