कोपरगाव, दि २५ : चंद्रकांत जोर्वेकर
कोपरगाव तालुक्यातील बेट येथील राष्ट्रसंत श्री. जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांची जयंती यंदा ललित पंचमी, दि. २६ रोजी भक्तिभावात साजरी होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वेळी बाबाजींच्या समाधी स्थळी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी गर्दी करणार आहेत. बाबाजींची जयंती आणि नवरात्र उत्सव हे एकत्र येत असल्याने भक्तिमय वातावरण अधिकच उजळून निघाले आहे.
समाधी मंदिरालगतच असलेल्या कोपरगावजी माता जगदंबा भवानीचे प्राचीन मंदिर व जेऊर कुंभारी गावातील जुने गंगा देवी मंदिर येथे नवरात्रोत्सवात देवीदर्शनासाठी येणारे भाविक, बाबाजींच्या समाधीचेही दर्शन घेऊन लाभ घेतात. त्यामुळे या परिसरात उत्साह आणि भक्तिभावाची रेलचेल दिसून येते.
बाबाजींच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी विशेष पूजा, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




















