कोपरगाव,दि.१९ ( दिलीप गायकवाड )
कोपरगाव तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मध्यरात्रीपासून प्रचंड प्रवाहात वाहू लागली आहे. नदीचा वाढलेला प्रवाह पाहून परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यात गोदावरी नदीला भरते येते, मात्र यंदा श्रावणाआधीच नदी वाहू लागल्याने निसर्गाच्या या आगळ्यावेगळ्या रूपाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही घटना या भागात पावसाळा लवकर सुरू झाल्याचं संकेत देत आहे.

गोदावरी नदीचा उगम नाशिकजवळील त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो. शास्त्र आणि पुराणांनुसार ही पवित्र पापनाशिनी नदी असून, तिला गंगा किंवा गौतमी म्हणूनही ओळखले जाते. या गौतमी नदीकाठावर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे.
कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या या पवित्र नदीच्या काठावर अनेक धार्मिक स्थळं आहेत. यामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्यांची तपोभूमी प्रती-त्र्यंबकेश्वर मंदिर, पुणतांब्यातील संत चांगदेव महाराज समाधी, कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी मंदिर, शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर यांचा समावेश होतो. साईबाबांनी कोपरगाव येथे तप केल्याने येथेही त्यांची तपोभूमी प्रसिद्ध आहे.
गोदावरी नदीचा उल्लेख पेशवाई काळात “गोदावरी” या नावाने झाला आणि नंतर हे नाव प्रचलित झाले. या नदीमुळे कोपरगावसह संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. गोदावरी नदीला अनेक मोठ्या पुराचा इतिहासही आहे.
कोपरगावातील राघोबा महाराज पेशवे यांचा वाडाही याच नदीतीरावर आहे. आजही हा वाडा अस्तित्वात असून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
सध्या वाहणारा गोदावरीचा प्रवाह थेट समुद्रात मिळतो, पण त्याआधी तो असंख्य गावांना जीवनदान देतो. कोपरगाव परिसरात गोदावरीच्या या नव्या प्रवाहामुळे नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




















