उद्योग–कारखान्यांना शासनाचे सक्त आदेश
मुंबई, दि. १२ : अजय मगरे
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, या दिवशी मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी किंवा किमान तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय आस्थापना, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक संस्था व तत्सम कार्यालयांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक क्षेत्रात तसेच त्या बाहेर कार्यरत असलेले सर्व कामगार, अधिकारी व कर्मचारी मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक असून, उद्योग–ऊर्जा–कामगार विभागांतर्गत येणाऱ्या कारखाने, दुकाने, हॉटेल्स, आयटी कंपन्या, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, किरकोळ विक्रेते व इतर सर्व आस्थापनांना हे आदेश लागू राहणार आहेत.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी शक्य नसल्यास किमान तीन तासांची सशुल्क मतदान सवलत देणे आवश्यक असून, आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शासन निर्णयात देण्यात आला आहे.
सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड,छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर यांचा समावेश आहे.




















