पैठण. दि. २८ .प्रतिनिधी
पैठण नांदर येथे गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी रात्री झालेल्या या पावसामुळे संपूर्ण गावात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सोमवारी सायंकाळपासून विजेच्या कडकडाटासह दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे नांदर व दावरवाडी परिसरात आंब्याच्या फळबागांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
या संदर्भात शेतकरी अभ्यासक व नाम फाऊंडेशन, पुणे चे प्रतिनिधी किशोर पाटील तांगडे यांनी सांगितले की, “रविवारी सायंकाळपासून झालेल्या पावसामुळे फळबागांचे आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.”
नांदर येथील पोलीस पाटील गोपाल वैद्य यांनीही याबाबत चिंता व्यक्त करत सांगितले, “सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या फळबागांना विशेषतः मोठा फटका बसला आहे. आंब्याचा हंगाम सुरु असतानाच झाडांवरील माल गळून पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.”
या पावसामुळे पैठणमध्ये 100 मिमी, पिंपळवाडीत 100 मिमी, बिडकीनमध्ये 113 मिमी, बालानगरमध्ये 123 मिमी, दावरवाडीत 120 मिमी, नांदरमध्ये सर्वाधिक 132 मिमी, पाचोडमध्ये 47 मिमी, आडुळमध्ये 70 मिमी, तर विहामांडव्यात 86 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकूण 980 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची जोरदार मागणी होत आहे.




















