पळ काढणाऱ्या अधिकाऱ्यावरच चौकशी करण्याचे आदेश..!
कोपरगाव, दि. २९ (दिलीप गायकवाड)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी अखेर सुरू झाली आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी यासंदर्भात कारवाईची प्रक्रिया राबवत बाजार समितीचे सचिव यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून,त्यांच्या कार्यकाळातील विविध बाबींवर सखोल चौकशी करण्याच्या सूचना चौकशी अधिकारी यांना केल्या आहेत.
विशेष म्हणजे या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त अधिकाऱ्याने “कार्यभार अधिक असल्यामुळे चौकशीस विलंब होईल” असा युक्तिवाद करत दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, जिल्हा उपनिबंधकांनी ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावत, मूळ चौकशी अधिकाऱ्यालाच चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता चौकशीचे लक्षच अधिकाऱ्याच्या जबाबदारीकडे वळले आहे.
या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस नेते विजय सुधाकर जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावत, २३ एप्रिल व ३० एप्रिल २०२५ रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी सादर केल्या होत्या. त्यांनी बाजार समितीमधील आर्थिक अपारदर्शकता, प्रशासकीय निष्काळजीपणा आणि संभाव्य भ्रष्टाचाराच्या घटना उघड केल्या.
तक्रारींमध्ये विविध ठेकेदार निवडीतील अनियमितता, खर्चाच्या नोंदीतील अपूर्ण माहिती, तसेच काही महत्त्वाच्या फायलींमध्ये फेरफार झाल्याचे गंभीर आरोप आहेत. या सगळ्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, समितीवर जनतेचा विश्वास ढासळला आहे. विजय जाधव यांनी या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या चौकशीतून कोणते तथ्य बाहेर येते आणि कोपरगाव बाजार समितीच्या कारभारात कोणता बदल घडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे




















