कोपरगाव, दि.१७ ( दिलीप गायकवाड )
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय सेवा सुरळीत असून रुग्णांना योग्य ते उपचार वेळेत दिले जातात, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश यांनी स्पष्ट केले. काही माध्यमांनी रुग्णालयाबाबत केलेल्या नकारात्मक वृत्तांकनावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एका गरोदर महिलेच्या उपचारास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना डॉ. गिरीश म्हणाले, “सदर महिला पेशंट रुग्णालयात दाखल झाली होती. तिची प्रकृती पाहून सर्व तयारी सुरू होती. काही वैद्यकीय बाबतीत वेळ लागू शकतो. तिच्या सोबत नातेवाईक सुध्दा होते.तसेच त्यांच्याकडे उपचारासाठी आवश्यक निधी नव्हता. अशा परिस्थितीत पुढील

उपचारासाठी रुग्णालय शोधावे लागते, त्याठिकाणी आधी संपर्क साधावा लागतो. ही एक प्रक्रियाच असते.”
“सर्व तपासण्या झाल्यानंतर मी स्वत: त्या महिलेला पुढील उपचारासाठी ऑम्ब्युलन्सद्वारे हलवले. रुग्णसेवा आमच्यासाठी प्राधान्याची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते रुग्णालयात उपस्थित होते. मात्र, त्यांचा रुग्णसेवेवर काही परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांनी सत्यता न तपासता आरोप केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. “रुग्णालयात अजून दोन ऑम्ब्युलन्सची नितांत गरज आहे. तसेच गरीब रुग्णांसाठी सामाजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यातूनच अशा घटनांना आळा बसेल,” असेही डॉ. गिरीश यांनी नमूद केले.
“जे काही अन्य आरोप करण्यात आले आहेत, त्यावर मला काही बोलायचे नाही. माझे आणि कर्मचाऱ्यांचे एकच ध्येय आहे – रुग्णसेवा,” असे त्यांनी स्पष्ट केले.




















