बदल्यांमध्ये राजकीय दबाव; म्हाडाच्या २५ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई, दि. १७ (मंगेश म्हात्रे)
म्हाडामधील शासकीय बदल्यांमध्ये राजकीय शिफारशींचा वापर करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५ अधिकाऱ्यांना म्हाडाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बदल्यांचे आदेश रद्द करण्यासाठी खासदार, आमदार व अन्य राजकीय व्यक्तींमार्फत शिफारशी करून वरिष्ठांवर दबाव टाकल्याचा आरोप या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आहे.
राज्य शासनाने २६ जुलै २०११ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने वैयक्तिक कामांसाठी राजकीय शिफारस घेणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियम २३ चे उल्लंघन मानले जाते. म्हाडाने केलेल्या प्राथमिक चौकशीत या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर म्हाडा सचिव यांनी नोटीस बजावली असून, संबंधित अधिकाऱ्यांना ४८ तासांच्या आत आपला लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे शासकीय यंत्रणांमध्ये सुरू असलेल्या वशिलाबाजीवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, म्हाडाने भविष्यात अशा प्रकारावर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
यासंदर्भात म्हाडा सचिव नीलिमा धायगुडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “वरिष्ठांच्या निर्देशानुसार बदल्यांमध्ये शिफारस करणाऱ्या ५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकाराला चाप बसवण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात येणार आहे.”




















