विकासक-वास्तुविशारदांची समिती स्थापन करणार – महेंद्र कल्याणकर
मुंबई,दि.७ ( मंगेश म्हात्रे )
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या (एसआरए) वतीने विकासक व वास्तुविशारद यांची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन जलद, पारदर्शक व लाभार्थीकेंद्री होण्यासाठी प्राधिकरण कटिबद्ध असून त्यासाठीच्या अडथळ्यांचे तातडीने निराकरण करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी विकासक आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीद्वारे प्रकल्पातील तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय अडथळे दूर करण्यात येणार आहेत.
तसेच, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना अडथळा ठरणाऱ्या झोपडीधारकांविरोधात ठराविक वेळेत मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या कलम ३३ व कलम ३८ अंतर्गत निष्कासनाची कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमुळे गरीब वसाहतीतील रहिवाशांना चांगली घरे मिळून त्यांचा जीवनमान उंचावण्याचा सरकारचा उद्देश असून त्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले.




















