ठाणे,दि.८ (अजय मगरे )
मुंबई महानगर क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरवत कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आता प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ, गतीमान व सुरक्षित होणार असून दररोज लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मेट्रोशी संलग्न असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकार झाला आहे.

वाहतुकीस दिलासा देणारे फायदे – ठाणे, मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, वसई, विरारमधील दळणवळण अधिक सुलभ,
जेएनपीटी, वाशी व ठाणे दरम्यानचा कार्यालयीन प्रवास जलद, घोडबंदर रोडवरील जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी, गायमुख ते वाघबीळ दरम्यान भूमिगत मार्गामुळे अखंड वाहतूक…
तांत्रिक वैशिष्ट्ये – दोन लेन रचना, ७.५ मीटर रुंदी, २x२ अंडरपास व एकूण रॅम्प लांबी ७२१ मीटर, दररोज ७३,३३३ पीसीयू वाहतूक हाताळण्याची क्षमता….
या प्रकल्पामुळे घोडबंदर रोडवरील प्रवासाचा कालावधी कमी होऊन सरासरी वेग वाढणार असून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसह मालवाहतुकीसही मोठा दिलासा मिळेल.सुसंलग्न व गतिमान मुंबई महानगराकडे वाटचाल करण्याच्या दिशेने कासारवडवली उड्डाणपुलाचा हा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे.




















