झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची धडक कारवाई
धारावीतील सिद्धिविनायक सोसायटीतील अंगणवाडीत बेकायदेशीर राहणाऱ्यांवर कारवाई…
मुंबई, दि.२० : मंगेश म्हात्रे
धारावी येथील सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था या पुनर्वसन इमारतीमधील अंगणवाडीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कारवाई करत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. इमारतीतील अंगणवाडी सदनिका क्र. २०१ मध्ये गेल्या नऊ वर्षांपासून अंगणवाडी सेविकांचा ताबा नव्हता आणि काही व्यक्ती तेथे बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.
शहर विशेष कक्षाच्या उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या समवेत प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर सदनिका ही अंगणवाडी सेवांसाठी राखीव असूनही ती खासगी वापरासाठी बेकायदेशीररीत्या वापरली जात होती, याची माहिती मिळताच प्राधिकरणाने कठोर पावले उचलली. यापुढे एसआरए इमारतीतील ऑफिस, बालवाडी, समाज मंदिर जर बेकायदेशीर रित्या दिले असेल, तर अशा प्रकारचे अनधिकृत वापर रोखण्यासाठी नियमित तपासणी केली जाईल, असेही प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.




















