धारावी गणेश नगर – मेघवाडीतील रहिवाशांना नोटिसा; भाडे घ्या, घरे खाली करा—तात्पुरते स्थलांतर लादल्याचा आरोप
मुंबई, दि. १६ : मंगेश म्हात्रे
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) सुरुवातीपासूनच धारावीतील रहिवाशांना ‘की-टू-की’ पद्धतीने घरे देणार, कोणालाही संक्रमण शिबिरात पाठवले जाणार नाही, अशी ठाम घोषणा डीआरपी कडून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या घोषणेला हरताळ फासला जात असून, डीआरपी सेक्टर-१ मधील गणेश नगर–मेघवाडी परिसरातील सुमारे ४२ कुटुंबांना अचानक नोटिसा देत भाडे स्वीकारून तात्पुरत्या स्थलांतरास भाग पाडण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी “काही रहिवाशांचे स्थलांतर अपरिहार्य आहे,” असे सांगत दरमहा १८ हजार रुपये भाडे देण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र मुंबईतील वाढत्या घरभाड्याच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अपुरी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच संक्रमण शिबिरात घरे न देता भाड्यावर पाठवणे म्हणजे ‘की-टू-की’च्या वचनालाच छेद असल्याची टीका रहिवाशांकडून केली जात आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी मेघवाडीतील ४२ झोपड्या हटविणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासाठी आधीच रहिवाशांशी सुसंवाद साधता आला असता, तर अचानक नोटिसा देण्याची गरज भासली नसती, असे रहिवाशांचे म्हणने आहे. “आम्ही प्रकल्पाच्या विरोधात नाही; मात्र भाड्याऐवजी संक्रमण शिबिर दिले पाहिजे,” असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
भाडे सहाय्य, ब्रोकरेज तसेच आगाऊ १२ महिन्यांचे भाडे देण्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, पात्रतेचे निकष आणि पुढील टप्प्यांबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे. “सन्मानाने जगण्याचे आश्वासन दिले जात असताना, घरे रिकामी करण्यासाठी दबाव का?” असा थेट प्रश्न स्थानिक रहिवासी सलीम भाई विचारत आहेत.
एकीकडे पुनर्विकासाचे गोडवे गायले जात असताना, दुसरीकडे ‘की-टू-की’चे वचन मोडून संक्रमण, स्थलांतर आणि अनिश्चिततेचा फटका सामान्य धारावीकरांना बसत असल्याचे चित्र सध्या धारावी परिसरात दिसून येत आहे.




















