कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी निवेदन
कोपरगाव : चंद्रकांत जोर्वेकर
कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची सर्व सोयीसुविधांनी युक्त नवी इमारत पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटन न झाल्याने नागरिकांसह पोलिसांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर माझं गाव माझं अभियानच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. रामजी शिंदे यांची कोपरगाव येथे भेट घेऊन तातडीने उद्घाटन करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

सध्या कार्यरत असलेली ग्रामीण पोलीस ठाण्याची जुनी इमारत अत्यंत दयनीय अवस्थेत असून तेथे काम करणे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, नव्याने उभारण्यात आलेली पोलीस ठाण्याची इमारत पूर्णपणे तयार असून आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. मात्र केवळ उद्घाटनाअभावी ही इमारत अद्याप कार्यान्वित न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसह पोलिसांच्या कामकाजासाठी नव्या इमारतीचा तातडीने वापर सुरू करावा, अशी ठोस मागणी माझं गाव माझं अभियानच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत, विजय जाधव, मयूर आव्हाड आदी उपस्थित होते.














