उपवन तलावात चार दिवस कला, संगीत व नृत्याचा महासंगम
ठाणे, दि.२४ ( अजय मगरे )
ठाणेकरांचा बहुप्रतिक्षित संस्कृती आर्ट फेस्टिव्हल ६ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान उपवन तलाव येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा फेस्टिव्हल ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ या संकल्पनेवर आधारित असून, याची अधिकृत घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या वेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे सेक्रेटरी मनोज पिल्लई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांची ‘शिंदेशाही’ ही विशेष मैफल होणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजात सुरेल संध्या रंगेल. ९ फेब्रुवारी रोजी ‘तारक मेहता’ फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल आयोजित करण्यात आली आहे.
यासोबतच कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम् कलाकार दीपक मुजुमदार यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांची सादरीकरणे होणार आहेत. लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत, भारूड, पोवाडा, अभंग यांचा सुंदर संगम या फेस्टिव्हलमध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. तसेच विविध कार्यशाळा, धाडसी खेळांची प्रात्यक्षिके आणि चित्रप्रदर्शन यांचाही समावेश करण्यात आला आहे.
ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




















