येवला–मनमाड मार्गावरील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची समीर भुजबळ यांची मागणी
मुंबई,दि.११. ( दिलीप गायकवाड )
कोपरगाव–येवला–मनमाड मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन एन.एच.१६०एच व एन.एच.७५२जी या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी काँक्रीट रस्त्यात रूपांतर तसेच येवला शहरासाठी बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तत्परतेने सादर करावा, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी हा निर्देश दिला. या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, कोपरगाव–येवला–मनमाड या मार्गावरील वाढती वाहतूक आणि भविष्यातील शहरविकास लक्षात घेऊन चौपदरी काँक्रीट रस्ता व बायपास मार्गाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. बायपास मार्गासाठी पर्यायी मार्ग निश्चित करताना भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन सर्व आवश्यक यंत्रणांच्या मान्यतांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. या प्रकल्पामुळे येवला शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला–मनमाड मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधले. या मार्गावर वाहनांची वाढती वर्दळ, विशेषतः जडवाहनांची गर्दी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जडवाहनांची वाहतूक पर्यायी मार्गांकडे वळवण्याची गरज असून वाहतूक पोलीस व जिल्हा प्रशासनाने यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांचा होणारा मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वयाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी नमूद केले.




















