कोपरगावात खळबळ
कोपरगाव : दिलीप गायकवाड
नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोरील कंपाऊंडमध्ये हा मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिसन ब्रॅच तीन-चारी विविध कार्यकारी सोसायटी, पोस्ट ऑफिस, जिल्हा बँक शाखा आणि शाळेचे कार्यालय असलेल्या संकुलातील कर्मचारी सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी आले. कंपाऊंडचे गेट उघडल्यानंतर शाळेच्या कार्यालयाजवळ एका पुरुषाचा मृतदेह दिसून आला. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून तो नेमका कोण, तसेच त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमागे नेमके कारण काय, तसेच मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार असल्याचे स्पष्ट होईल.




















