देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये ‘God’ नावाने सेव्ह असलेली व्यक्ती म्हणजे पुण्यातील APMA (अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी) मधील फिजिक्स विषयाचा प्राध्यापक तेजस हर्षदकुमार शहा असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, तेजस शाहाने NEET परीक्षेचे पेपर 2 लाखांपासून तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत विकल्याचा संशय आहे. सीबीआय सध्या पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची यादी तयार करत असून ही यादी ‘God’ अर्थात तेजस शहाकडे असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाने सीबीआय चौकशीत धक्कादायक दावा केला आहे. “परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधीच वडिलांकडे पेपर उपलब्ध होता,” असे त्याने तपासात सांगितल्याची माहिती आहे.
सीबीआयच्या तपासात NEET पेपरफुटी रॅकेटची व्याप्ती महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, केरळ आणि बिहार या पाच राज्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. या संपूर्ण प्रकरणात डॉ. मनोज शिरूरे हे महत्त्वाचे ‘स्टार साक्षीदार’ ठरू शकतात, अशी चर्चा आहे.
याशिवाय नागपूरच्या शुभम खैरनारने किमान 1 हजार विद्यार्थी आणि पालकांची यादी सीबीआयकडे दिल्याची माहिती समोर आली असून, तपास आणखी वेगाने पुढे जात आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणात रोज नवे खुलासे होत असून, देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.




















