धारावीकरांचे हित, रोजगार आणि स्थानिक ओळख जपण्यास सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ८ जून :
सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार असून, हा प्रकल्प राबवताना स्थानिक नागरिकांचे हित, रोजगार, उपजीविका आणि धारावीची ओळख जपण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. नियोजित वेळेत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, धारावी पुनर्विकास हा केवळ इमारती बांधण्याचा प्रकल्प नसून धारावीतील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम आहे. धारावीतील औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था कायम ठेवत स्थानिकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करण्यात येणार आहे. नागरिकांच्या रोजगार आणि व्यवसायांचे संरक्षण करणे ही या प्रकल्पाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
धारावीतील प्रसिद्ध कुंभारवाडा हा सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा महत्त्वाचा भाग असल्याने त्याचे वैशिष्ट्य कायम ठेवण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
२०२८ पर्यंत पहिल्या टप्प्यात १० हजार घरे देण्याचे लक्ष्य
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मार्च २०२८ पर्यंत किमान १० हजार घरे नागरिकांना देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या जलद मिळाव्यात यासाठी विशेष कक्ष उभारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
नव्या घरांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर, शयनकक्ष, स्वच्छतागृहे आणि नैसर्गिक प्रकाशाची व्यवस्था असेल. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह सुविधेवरही विशेष भर दिला जाणार आहे.
देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्गांना जोडणी मिळणार आहे. भविष्यात बुलेट ट्रेन जोडणीचाही विचार करण्यात येत आहे.
या हबमध्ये विमान प्रवाशांसाठी ‘सिटी चेक-इन’ सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. तसेच जलवाहतूक आणि भविष्यातील हवाई टॅक्सी सेवांसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
लघुउद्योग आणि रोजगाराला चालना
धारावीतील चामडे उद्योग, वस्त्रनिर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ उद्योगांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष योजना आखण्यात येत आहे. खाद्य व्यवसायासाठी आधुनिक ‘क्लाऊड किचन’ संकल्पनाही विकसित करण्याचा विचार आहे.
बीकेसी-धारावी परिसराला आंतरराष्ट्रीय स्वरूप
प्रकल्पांतर्गत बीकेसी ते धारावी परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून हरित पट्टे, आधुनिक पदपथ आणि पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. यामुळे धारावी आणि बीकेसी परिसराला जागतिक दर्जाचे स्वरूप प्राप्त होईल.
धारावी पुनर्विकास प्रकल्प १० वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पुनर्वसन इमारतींची कामे नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.




















