म्हाडामध्ये अभियंते आणि मिळकत व्यवस्थापक केबिनपासून वंचित; कामकाजावर परिणाम
मुंबई, दि.२३ ( मंगेश म्हात्रे )
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) विविध विभागांतील अभियंते आणि मिळकत व्यवस्थापक अद्यापही स्वतंत्र केबिनच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे त्यांचे दैनंदिन कामकाज अडथळ्यांतून पार पडत असून, नागरिक सेवा आणि कार्यालयीन कार्यक्षमतेवर याचा थेट विपरित परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
अभियंते म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांत्रिक, विकासात्मक व प्रशासकीय कामांसाठी जबाबदार असतात, तर मिळकत व्यवस्थापक रहिवासी इमारतींची देखभाल, भाडे वसुली आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम पाहतात. मात्र, कार्यालयांमध्ये स्वतंत्र केबिन्सची गैरसोय असल्यामुळे त्यांना आवश्यक असलेल्या एकांत आणि गोपनीयतेचा अभाव जाणवतो.
मुंबई मंडळातील घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, गोरेगाव, वांद्रे आणि पणन विभाग तसेच कोकण मंडळातील पणन विभाग व आर.आर. बोर्डच्या सं.गा.विभागात,मिळकत व्यवस्थापक केबिनची समस्या अधिक तीव्र आहे. तर बहुतेक अभियंत्यांना काही विभागात स्वतंत्र केबिन उपलब्ध नाही.
या बाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “महत्त्वाचे दस्तऐवज हाताळताना वा नागरिकांच्या तक्रारी ऐकताना गोपनीयतेची नितांत गरज असते. मात्र, केबिनच्या अभावामुळे सतत व्यत्यय निर्माण होतो आणि त्यामुळे कामकाजाची गती मंदावते.”
कर्मचाऱ्यांनी या प्रश्नाबाबत अनेकदा प्रशासनाकडे निवेदने सादर केली आहेत. तरीही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कृती झालेली नाही. परिणामी, कर्मचारी वर्गात अस्वस्थता असून, नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.
या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना प्रनिस विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल व्हटकर यांनी सांगितले की, “ज्या ठिकाणी केबिनची आवश्यकता आहे, तेथील प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव वास्तुविशारद विभागाकडे पाठवले असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.वास्तूशास्त्रज्ञची नियुक्ती झाल्यानंतर पुढील कामकाज होईल.”




















