मुंबई महानगरपालिकेच्या राजकीय इतिहासात आज नवा अध्याय लिहिला गेला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या किशोरी पेडणेकर यांची मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अधिकृत निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच एखाद्या महिलेला या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळाल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.
महापालिकेच्या सभागृहात झालेल्या प्रक्रियेनंतर किशोरी पेडणेकर यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधी पक्षनेते म्हणून प्रशासनावर प्रभावीपणे अंकुश ठेवत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचा निर्धार पेडणेकर यांनी व्यक्त केला.
किशोरी पेडणेकर या यापूर्वी मुंबईच्या महापौरपदी कार्यरत होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणून कामाचा अनुभव आहे याच अनुभवाच्या जोरावर विरोधी पक्षनेते म्हणून त्या अधिक सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील आगामी राजकीय घडामोडींवर या निवडीचा परिणाम होण्याची शक्यता असून शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर आता अधिक धारदार चर्चा पाहायला मिळेल.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने मुंबईच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.




















