सर्वपक्षीय सभेतून धारावीकरांचा निर्धार….
मुंबई , दि. ७ : मंगेश म्हात्रे
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या मनमानी कारभार, निष्काळजी धोरणे आणि अदानी समूहाला दिलेल्या प्राधान्याविरोधात आज धारावीत सर्वपक्षीय संतापाचा स्फोट झाला. धारावीकरांनी कामराज हायस्कूल येथे भरलेल्या सभेत सरकारचा जोरदार निषेध नोंदवत, “कितीही ताकद लावा… आम्ही अदानीला धारावीतून पळवूनच लावू!” असा ठाम नारा दिला.
सभेत धारावीचा पुनर्विकास धारावीतच झाला पाहिजे, विस्थापन स्वीकारले जाणार नाही, ही मागणी एकमुखाने मांडण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले, “धारावीच्या सोन्यासारख्या जमिनीवर सरकारची नजर आहे. अदानीला पुढे करून धारावीकरांना फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गरीब समजून जमिनी हडपायचा डाव केला जात आहे; पण कितीही ताकद लावा, उबाठा आणि मित्रपक्ष मिळून अदानीला धारावीत टिकू देणार नाही!” त्यांनी धारावीकरांना एकजूट राखण्याचे आवाहनही केले.नागपूर अधिवेशनात धारावीचा प्रश्न जोरकसपणे मांडणार असल्याची ग्वाही आमदार महेश सावंत यांनी दिली.
सभेला कॉम्रेड प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, आप मुंबई अध्यक्षा प्रीती मेमन शर्मा, माजी आमदार बाबुराव माने, साम्या कोरडे यांची भाषणे झाली. सर्वांनी एकाच सुरात—सरकारच्या पुनर्विकास योजनेतील अन्याय, विस्थापनाचा धोका आणि अदानीवरील अवाजवी मेहेरनजर यावर तीव्र आक्षेप नोंदवला.
या सर्वपक्षीय सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आरिफ सय्यद, उलेश गजाकोश, शेकापचे राजू कोरडे काँग्रेसचे सुभाष पाखरे, अरुणा चलम आपचे एन आर पॉल मनसे’चे आरिफ शेख कॉ. वसंत खंदारे, नसरूल हुसेन आदी उपस्थित होते, या सभेला धारावीकर प्रचंड संख्येने उपस्थित होते.




















