नंदनवनवर इच्छुकांची रांग — राज सुर्वे की बाळकृष्ण ब्रीद?
मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या जागांवरून शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानावर इच्छुकांच्या फेऱ्या वाढल्या असून या दोन जागांसाठी पक्षात पडद्यामागील राजकीय हालचाली वेगाने सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
माजी नगरसेवक, पराभूत उमेदवार आणि पदाच्या शर्यतीत असलेले इच्छुक नेते शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर सतत भेटी देत असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांकडे शिफारशी, संपर्क आणि राजकीय वजन वापरून संधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या पदासाठी सध्या बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
• बाळकृष्ण ब्रीद यांना यापूर्वी पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला होता; मात्र कागदोपत्री अडचणींमुळे उमेदवारी अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे पक्ष त्यांना “राजकीय पुनर्वसन” म्हणून संधी देऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते.
• तर दुसरीकडे, प्रकाश सुर्वे यांची नाराजी दूर करण्यासाठी राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
शिवसेनेत अंतर्गत हालचालींना वेग
या दोन जागांसाठी सुरू असलेल्या लॉबिंगमुळे शिवसेनेत अंतर्गत राजकारण तापल्याचे चित्र आहे. अखेर पक्ष नेतृत्व कोणावर शिक्कामोर्तब करणार, याकडे आता मुंबईतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




















