बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने जाहीर निषेध
कोपरगाव : दि.२८ : दिलीप गायकवाड
बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष बद्रिनाथ हरिभाऊ बोराडे यांच्यावर काल मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नगरपरिषद हद्दीतील बेट (दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर परिसर) येथे ही घटना घडली. शेजारी राहणाऱ्या बनसोडे यांनी बोराडे यांच्या सुनबाईशी वाद घातला. त्यातून वाद चिघळताच बनसोडे यांनी बोराडे यांच्यावर थेट कुर्हाडीने दोन वार करून डोक्यात गंभीर जखमा केल्या. या दरम्यान त्यांच्या पत्नीवरही बेदम मारहाण करण्यात आली.
जखमी बोराडे यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. दरम्यान, बोराडे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेविरोधात बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. संस्थेने दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.




















