रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज निलक यांची राज्यपालांकडे मागणी…
कोपरगाव, दि.१८ : दिलीप गायकवाड
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेची नोंदणी रद्द झाल्यानंतरही संस्थेच्या मालमत्तांमध्ये गैरव्यवहार सुरूच असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज बाबुराव निलक यांनी राज्यपाल सह मुख्यमंत्री, महसूलमंत्री, मुख्य सचिव आणि अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

निलक यांनी निवेदनात म्हटले आहे की, दि. २८ मे २०२० रोजी संस्थेची नोंदणी रद्द झाल्याने संस्था विघटित झाली,
तरीही संचालक मंडळाकडून बेकायदेशीर कारभार सुरू आहे. संस्थेची स्थापना १९८३ मध्ये झाली होती व २७३ सभासदांना ब्लॉक्स वाटप झाले. संस्थेकडे एकूण १८,५०० चौ. मीटर क्षेत्रफळाची मालमत्ता असून, तीन योजनांतून भुखंडांचे वाटप झाले आहे.
मात्र, सभासदांची संख्या २७३ वरून ३४१ झाली असून, ६८ सभासद कुठून आले, याचा तपशील नाही. जमिनीच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांवर अद्याप माजी प्रमोटर यांची नावे व बँकेचा बोजा दिसत आहे. यामुळे सदस्यांना शासकीय योजनांचा लाभही मिळत नाही.
तसेच संस्थेच्या आवारातील महादेव मंदिर, हनुमान मंदिर व सभामंडप माजी संचालकांनी वैयक्तिक वाहनतळासाठी वापरात आणले असून नागरिकांना धार्मिक कार्यक्रमांसाठी अडचणी निर्माण होत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. संस्थेच्या जागेवर खासगी शाळा उभारण्यात आली असून, काही रस्तेही अडवण्यात आले आहेत.
निलक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.




















