‘कै. वसंतदादा चोरगे’ नाव देण्याचा प्रस्ताव
नगरपालिकेकडे जयहिंद विचार मंचाचे निवेदन
कोपरगाव,दि.२६.दिलीप गायकवाड
शहरातील इनडोअर गेम हॉल शेजारील मोकळी जागा कचर्याचे ठिकाण बनत असून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. या जागेचा जेष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज विरंगुळा उद्यान म्हणून विकास करून त्यास “जेष्ठ नागरिक कै. वसंतदादा चोरगे उद्यान” असे नामकरण करावे, अशी जोरदार मागणी जयहिंद विचार मंचाने केली आहे.
या संदर्भात मंचाचे उपाध्यक्ष दिलीप घुमरे यांनी मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांना निवेदन सादर केले. शहरातील इनडोअर गेम हॉल शेजारील जागा सध्या पडून असून काही नागरिकांकडून तेथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्या जागेचा सुयोग्य वापर करून जेष्ठ नागरिकांसाठी बाके, चालण्याचा ट्रॅक, हिरवळ, वृक्षारोपण, प्रकाश व्यवस्था अशा सुविधा उभाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले १९७५ सालचे शिंगणापूर येथील रहिवासी कै. वसंतदादा चोरगे यांच्या स्मरणार्थ या उद्यानास त्यांचे नाव द्यावे, अशी नागरिकांची भावना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कै. चोरगे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचा किशोर चोरगे उल्लेख केला आहे.
येत्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मान्यता देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी जयहिंद विचार मंचाने केली आहे. आता नगरपालिका प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















