मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ
मुंबई : अजय मगरे
खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने धावतो, असा ठाम इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला जागतिक दर्जावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. “कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच उद्योग, गुंतवणूक आणि विकासाला चालना मिळते,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनावेळी कलीना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. या सोहळ्याला मंत्री मंगल प्रभात लोढा, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची उपस्थिती होती.
सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आहे,” असे सांगत शिंदेंनी पोलिसांसाठी आधुनिक सुविधा, सुसज्ज पोलीस ठाणी, अत्याधुनिक शस्त्रे, वाहने आणि सायबर सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञान देण्यावर भर असल्याचे ठणकावले.
खाकी वर्दीतील पोलिसांना क्रीडावेशात पाहून अभिमान वाटतो, असे सांगत त्यांनी या स्पर्धांना “महाराष्ट्राचे महा ऑलिम्पिक” असे संबोधले. “हे मैदान आहे, इथे पंच आहेत; पण पंचनामा नाही… इथे नोंद होईल ती विक्रमांची!” या दमदार वाक्याने उपस्थितांमध्ये जल्लोष उसळला.
राज्य पोलीस केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरते मर्यादित नसून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही चमकत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. भविष्यात पोलीस खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.
पोलिसांच्या कष्टमय जीवनाचा उल्लेख करताना शिंदेंनी सांगितले की, सण-उत्सव, मोर्चे, आपत्ती यावेळी कुटुंबापासून दूर राहून ते जनतेचे रक्षण करतात. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हा मंत्र जपत काम करणाऱ्या पोलिसांसाठी अशा क्रीडा स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्याचे प्रभावी माध्यम ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
मुंबई हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे सांगत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या बळावरच विकासाची गती वाढत असल्याचा पुनरुच्चार केला. गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढले असून सुमारे ९० टक्के प्रकरणे ६० दिवसांत निकाली निघत असल्याचा दावा त्यांनी केला.
कलीना येथील सुसज्ज मैदान आणि पोलीस कॉलनीचे कौतुक करत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. पोलीस केवळ कर्तव्यदक्ष नाहीत, तर क्रीडा, संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रातही आघाडीवर असल्याचे सांगत त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.
शेवटी भावनिक शब्दांत शिंदेंनी सांगितले, “खाकी म्हणजे सेवा, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक!”
या स्पर्धांमुळे राज्यभरातील पोलीस एकत्र येत आपली क्षमता सिद्ध करत असून, खंबीर सरकार आणि जागतिक झेप घेणारे महाराष्ट्र पोलीस असा स्पष्ट संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.



















