मुंबई,दि.२४ ( प्रतिनिधी )
राज्यातील महिलांसाठी एक सक्षम आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने राज्य शासन कटिबद्ध असून, “चौथे महिला धोरण – २०२४” हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत केले.
महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी मुंबईतील महिलांसाठी एक सर्वसमावेशक ॲप तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या ॲपद्वारे महिलांसाठी सुरक्षा, आरोग्य, शिक्षण व स्वयंपरावलंबनाच्या योजना सहज उपलब्ध होतील.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या धोरणात नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल, पाळणाघरांची सुविधा तसेच
महिला बचतगटांना रोटेशन पद्धतीने स्टॉल उपलब्ध करून देणे,महिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढविणे,महिला मच्छिमारांसाठी योजना राबविणे व आदिवासी महिलांसाठी विशेष प्रयत्न करणे महिलांना आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून देणे,घरांच्या प्रकल्पांना गती देणे
या बाबीवर विशेष भर देण्यात येणार आहे.महिला हिंसाचारास आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असून, “हेल्प डेस्क”, “हिरकणी कक्ष”, “वन स्टॉप सेंटर”, “महिला समुपदेशन केंद्र” यांचे काम नियमित सुरू ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले. पोलीस स्टेशनमध्ये महिलांना तक्रार करताना सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळाले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना”, “लखपती दीदी योजना”, “मोफत उच्च शिक्षण योजना” यासारख्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याचेही निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली तर महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी चौथे महिला धोरण संदर्भातील कामाचे सादरीकरण केले.या बैठकीत आरोग्य, पोलीस, कौशल्य विकास विभागांकडून मुंबई शहरात राबवण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही देण्यात आली. यावेळी या बैठकीत प्रधान सचिव नविन सोना, जिल्हाधिकारी आंचल गोयल, उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




















