अहिल्यानगर, दि.२१ : दिलीप गायकवाड
महाराष्ट्रातील जात पडताळणी समित्यामध्ये बदल करून त्याऐवजी कुटुंबाला सामूहिक प्रमाणपत्र देण्याची सुधारणा करावी, अशी मागणी आदिवासी महादेव कोळी युवक संघाचे महाराष्ट्रअध्यक्ष अमित आगलावे यांनी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, “माधुरी पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन” या सर्वोच्च न्यायालयाच्या १९९४ मधील निकालाचा अर्थ लक्षात घेऊन महाराष्ट्रात जात पडताळणी समित्या स्थापन झाल्या. मात्र, त्या केवळ भ्रष्टाचाराचे आगार ठरल्या असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला धरून या समित्यात बदल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्या अहवालाची वाट न पाहता त्वरित निर्णय घ्यावा.”

जात पडताळणी समित्यांनी काही निर्णयात नुकसान संबंधित नमूद करून त्यांनी म्हटले की, “सदोष कामकाजामुळे उच्च न्यायालयाकडूनही वारंवार समिती सदस्यांवर दंड व निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा कारभार चालत असून यावर कोट्यवधी रुपयांचा शासन खर्च करतात.
यासोबतच त्यांनी एक महत्त्वाचा पर्यायही मांडला. “रक्त नात्यातील व्यक्तींना एकाच वेळी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र शिधापत्रिकेसारखे देण्यात यावे, जेणेकरून पुन्हा पुन्हा पडताळणी करण्याची गरज भासणार नाही. यामुळे समित्यांवरील ताण ७० टक्क्यांनी कमी होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“सरकार समाजाबद्दल संवेदनशील आहे व सामाजिक बांधिलकी जपणारे आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजासाठी हे निर्णय त्वरीत घ्यावेत,” अशी अपेक्षा व विनंतीही त्यांनी केली आहे.
निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांच्यासह युवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.




















