दावरवाडी, दि.१५. ( अभिजीत सोनवणे
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सोलर ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करत लूटमार करणाऱ्या अट्टल टोळीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधार पवन उर्फ छन्नू महादेव काळे याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली असून, सुमारे १७ लाख ८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री पाचोड येथील सब स्टेशनवर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून सोलर प्रकल्पातील तांब्याची वायर चोरी केली होती. सोलर टेक्निशियन भाऊसाहेब लहू पवार यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खामकरवाडी येथे सापळा रचण्यात आला. पोलिसांनी १३ मार्च रोजी गनिमी काव्याने कारवाई करत ‘मोस्ट वाँटेड’ आरोपी पवन काळे याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सुनिल बापू तपकिरे (रा. भोसा), तवाब नवाब खान (माल विकत घेणारा दुकानदार) आणि ईश्वर पांडुरंग गवळी (गाडीचा मालक) यांना अटक केली.
तपासात ही टोळी छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले आहे. तसेच मुख्य आरोपी पवन काळे हा धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि मुरुम पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचेही उघड झाले. धुळे-सोलापूर महामार्गावर टायर फेकून वाहनांची लूट करण्याच्या प्रकारातही त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली विना क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ, मोबाईल फोन, चोरीची तांब्याची वायर आणि रोख रक्कम असा एकूण १७,०८,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत.




















