अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
मुंबई, दि. २९ : अजय मगरे
पुणे आणि परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी करत, तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करण्याचे साकडे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे घातले आहे.
या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही मार्गांवरील वाहनतळावाढ आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, या मार्गांचे तत्काळ सहा लेनमध्ये रुपांतर करणे आवश्यक आहे.
पवार यांनी स्पष्ट केले की, सद्यस्थितीत; महामार्ग क्र. ६० हा चार लेनचा असून तो सहा लेनमध्ये करणे गरजेचे आहे.
महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) सुद्धा चार लेनवरून सहा लेनमध्ये रूपांतरित करावा.
तर महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) सध्या दोन लेनचा असून तो थेट सहा लेनमध्ये करण्याची आवश्यकता आहे.
या मार्गांवर शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम उद्योग, वाहतूक हब आदी असून, प्रचंड वाहनवाहतुकीमुळे कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. वाहनचालकांच्या सुरक्षेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले.
उपमुख्यमंत्री म्हणाले, “या महामार्गांवरील वाहनांच्या संख्येने मर्यादा ओलांडल्या आहेत. आगामी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठी पर्यायी मार्ग म्हणून हे रुंदीकरण उपयोगी ठरेल.”
पुणेच्या प्रवेशद्वाराशी संबंधित हे मार्ग असल्यामुळे, शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळेच शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढत आहे. विशेषतः तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरण एलिव्हेटेड हायवेच्या निविदा प्रक्रियेदरम्यान तात्पुरत्या पर्यायाचं काम करू शकतो.
या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देऊन आवश्यक निधी आणि प्रशासनिक मान्यता मिळवून द्यावी, अशी विनंती पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे. यामुळे पुणे औद्योगिक व नागरी परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.




















