त्र्यंबकेश्वर येथे बुद्ध विहार उद्घाटन; भव्य धम्म मेळावा उत्साहात
नाशिक, दि.३.( अजय मगरे )
भारतीय बौद्ध महासभा, नाशिक पश्चिम जिल्हा शाखेच्या वतीने त्र्यंबकेश्वरजवळील पिंपळद येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराचे उद्घाटन व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य. आंबेडकर, भंते बी. सुमेधबोधी व ॲड. एस. के. भंडारे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर भव्य धम्म मेळावा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी त्र्यंबकेश्वर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर ते पिंपळद अशी रथातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर म्हणाले, “बुद्ध विहार हे केवळ प्रार्थनास्थळ न राहता संस्कार केंद्रे बनली पाहिजेत. समाजात समतेची जाणीव निर्माण करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे.” पिंपळद ग्रामस्थ व युवक मंडळाने १० दिवसांचे श्रामणेर शिबिर व धम्म मेळावा यशस्वी केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
सकाळच्या सत्रात नाशिक रोड येथील ऐतिहासिक कर्मभूमी बुद्ध विहारास भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी “मिशन-२५” अंतर्गत निश्चित ध्येय ठरवून काम करण्याचे आवाहन केले. दुपारी भगूर शाखेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त २५ शाखांचे उद्घाटन, ५० जणांना माता रमाई पुरस्कार वितरण व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास बी. एच. गायकवाड, ॲड. डॉ. एस. एस. वानखडे, यू. जी. बोराडे, शरद भोगे, कृष्णाजी सोनवणे, रितेश गांगुर्डे, उर्मिलाताई गायकवाड, रविंद्र सोनवणे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मेजर जनरल हिरामण अहिरे यांच्या नेतृत्वाखाली सैनिकांनी डॉ. आंबेडकर यांना सलामी दिली.
पिंपळद, भगूर व नाशिक परिसरातील कार्यकर्ते, बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकारी व युवक मंडळांच्या सहकार्याने करण्यात आले.




















