१७ सप्टेंबरला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; बीडकरांची दीर्घकाळची मागणी पूर्ण
मुंबई : अजय मगरे
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे दरम्यान पहिली दैनंदिन थेट रेल्वेसेवा सुरू होणार आहे. मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात येणाऱ्या या सेवेमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र थेट रेल्वेने जोडला जाणार असून, बीडकरांची दीर्घकाळची मागणी पूर्णत्वास येणार आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत १७ सप्टेंबर रोजी बीड रेल्वे स्थानकावरून बीड-पुणे उद्घाटन विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
बीड-पुणे उद्घाटन विशेष रेल्वे क्रमांक ०१४०१ बीडहून पुण्याच्या दिशेने रवाना होईल. या गाडीला अमळनेर भांड्याचे, नवीन आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाइन आणि उरुळी येथे थांबे देण्यात आले आहेत.
या रेल्वेत दोन एसी टू-टियर, तीन एसी थ्री-टियर, चार स्लीपर, चार जनरल सेकंड क्लास, एक सेकंड सिटिंग-कम-गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन अशी संरचना असेल.
*नियमित सेवा लवकरच*
उद्घाटन विशेषानंतर पुणे-बीड-पुणे दैनिक एक्स्प्रेस (११४३४/११४३३) नियमितपणे धावणार आहे. या सेवेच्या वेळा आणि थांब्यांची सविस्तर माहिती मध्य रेल्वेकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर-बीड-पर्ली वैजनाथ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पातील अहिल्यानगर-बीड विभाग कार्यान्वित झाल्यानंतर ही सेवा सुरू होत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
*विद्यार्थी, रुग्ण, व्यापाऱ्यांना फायदा*
बीड आणि परिसरातील विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण, यात्रेकरू तसेच पुण्याकडे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना या थेट रेल्वेसेवेचा फायदा होणार आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सोयीचा आणि किफायतशीर होण्यास मदत होणार आहे.
पुण्याच्या माध्यमातून बीडसह मराठवाड्याला महाराष्ट्रातील आणि देशातील अन्य भागांशी जोडणी मिळणार असल्याने व्यापार, पर्यटन आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.




















