एकनाथ शिंदे यांना ‘बुद्ध रत्न’ पुरस्कार प्रदान
ठाणे, दि.५. ( अजय मगरे )
“बौद्ध हा केवळ धर्म नसून व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. बुद्धांचे विचार प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सम्राट अशोक जयंतीच्या निमित्ताने ठाण्यात आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे गडकरी रंगायतन येथे या परिषदेत विविध देशांतील भिक्खू, विद्वान आणि धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शिंदे यांना ‘बुद्ध रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला “नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय” या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावून गेले. भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ आणि धम्मप्रेमी बांधव-भगिनींचे स्वागत केले.
या वेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे तसेच विविध देशांतील भिक्खू—भन्ते रत्नप्रिय थेरो, विशुद्धारत्न महाथेरो, विनय बोधी महाथेरो, शांतीप्रिय थेरो, भंते डॉ. राजरत्न थेरो आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या परिसरात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी तसेच प्राचीन सोपारा (नालासोपारा) येथील स्तूप आणि शिलालेख याचे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.
धम्म परिषद ही धम्मचळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचे नमूद करत त्यांनी आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत “संघदान ही केवळ परंपरा नसून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे,” असे ते म्हणाले.
बुद्ध रत्न’ पुरस्कार स्वीकारताना शिंदे म्हणाले, “अशा सन्मानांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते.”
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ओळी उद्धृत करत त्यांनी “मी वादळ वारा, मी भीमपुत्र आहे… मी बुद्धांचा अनुयायी, शांतीचा दूत आहे,” असे सांगत बुद्धांच्या विचारांचा संदेश दिला.
“बौद्ध धम्म हा दुःखातून मुक्ती देणारा मार्ग आहे. सत्य, अहिंसा आणि करूणेवर आधारित जीवनपद्धती म्हणजे धम्म. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या धम्मदीक्षेमुळे लाखो लोकांना समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाला,” असे त्यांनी नमूद केले.
जगातील वाढत्या युद्धपरिस्थितीचा उल्लेख करत “द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो शांत होतो,” हा बुद्धांचा संदेश आज अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा,” असा समतेचा संदेशही त्यांनी दिला.
भौतिक सुखाच्या स्पर्धेत मानसिक शांतता हरवत चालल्याची खंत व्यक्त करत “बुद्धांना मूर्तीत नव्हे तर विचारांत शोधले पाहिजे,” असे सांगून त्यांनी भाषणाचा समारोप केला.
“न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से…
दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से,”
या ओळींनी कार्यक्रमाला प्रेरणादायी शेवट झाला.




















