भिक्खू संघाच्या मिरवणुकीने परिसर दुमदुमला; धम्मदान, भोजनदानातून करुणा व समतेचा संदेश
ठाणे : अजय मगरे
अंबिका नगर येथील वेळुवण बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या वैशाख पौर्णिमा उत्सवाला यंदा मोठ्या उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरणाचे स्वरूप लाभले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर “एक गाव एक जयंती” आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात धम्म उपासकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा,ठाणे महानगर जिल्हा यांच्या वतीने आयोजित श्रामनेर शिबिरात सहभागी झालेल्या भिक्खू संघाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. “बुद्धं शरणं गच्छामि”च्या घोषणांनी आणि बुद्ध वंदनेच्या स्वरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. धम्म ध्वजांनी सजलेल्या
परिसरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत भिक्खू संघाचे स्वागत केले.
यावेळी भिक्खूंना भोजनदान, फळदान तसेच धम्मदान करण्यात आले. अनेक धम्म उपासकांनी श्रद्धेने दानकार्य करत बुद्धांनी दिलेल्या करुणा, मैत्री आणि समतेच्या शिकवणीचा जागर केला. कार्यक्रमात त्रिशरण पंचशील ग्रहण, बुद्ध वंदना तसेच धम्म प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांसह युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण अंबिका नगर परिसर बुद्धमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
वैशाख पौर्णिमा उत्सवामुळे समाजात बौद्ध धम्मातील मानवता, बंधुता आणि शांततेच्या मूल्यांचा प्रसार होत असून सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होत असल्याची भावना उपस्थित धम्म बांधवांनी व्यक्त केली.




















