युवासेना कार्यकारिणीत सदस्यपदी नियुक्ती
ठाणे, दि.३ : मंगेश म्हात्रे
महापालिकेतील सायन कोळीवाडा प्रभाग क्र. १७३ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. ठाणे येथील आनंदआश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिंदे यांनी भगवा झेंडा देत कांबळे यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले, तसेच त्यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर केली.

या पक्षप्रवेश सोहळ्यात नंदा बापू शाहू, नंदा पाटसुभे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर, रेखा तिवारी, मालन सावंत, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, युवासेना अधिकारी सचिन पडवळ, सहार येले, विनोद शर्मा यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “मुंबईतील अनेक माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत असून पक्षप्रवेशांची ही मालिका अजूनही सुरूच आहे. रामदास कांबळे यांच्या प्रभागातील संक्रमण शिबिरांतील रहिवाशांचे अनेक प्रश्न एसआरए व म्हाडाशी संबंधित आहेत. हे सर्व प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू.”
तसेच, आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीचा आढावा घेत शिंदे म्हणाले की, “मुंबईतील काँक्रिट रस्ते, बाळासाहेब ठाकरे दवाखाना, कॅशलेस वैद्यकीय सेवा, डीप क्लीन ड्राइव्हसारखे उपक्रम आम्ही राबवले आहेत. कोस्टल रोड, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्सवरील सेंट्रल पार्कसारखे प्रकल्प राबवून आम्ही मुंबईचा सर्वांगीण विकास साधत आहोत. मुंबईकर पुन्हा मुंबईत यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
या प्रसंगी मा. खासदार राहुल शेवाळे, मा. शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















