मुंबई, दि. १४ : अजय मगरे
पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात विद्यार्थी विकास कार्यक्रमांतर्गत कायदेविषयक अभ्यासावर परिसंवाद उत्साहात पार पडला. या परिसंवादात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत अभ्यासाबरोबरच वक्तृत्वकला, सभाधीटपणा, प्रभावी संवाद कौशल्य, संशोधन क्षमता आदी विविध कौशल्ये व कलागुण कसे विकसित करावेत, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

परिसंवादाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. गवई यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. एस. सुभाषचंद्र व प्रा. डॉ. देविदास शिंदे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमास प्रा. श्रीकांत ओझा, प्रा. ललित पगारे तसेच ॲड. लक्ष्मण बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायद्याच्या विद्यार्थिनी पूजा हेबळेकर यांनी केले.
परिसंवादात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यांना कायदेविषयक अभ्यासाची व्यापक दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




















