प्रश्नपत्रिका फुटी, शिक्षणातील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी निवेदन सादर
ठाणे, दि.३०.प्रतिनिधी
नीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 29 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले.
देशातील नीट-यूजी 2026 परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि पालकांच्या आर्थिक व मानसिक संघर्षावर पाणी फेरले गेल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये नीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढावे, सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) अधिनियम 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी, तसेच राधाकृष्णन समितीच्या शिफारशी तात्काळ लागू करून नीट परीक्षेची जबाबदारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (NTA) काढून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय देशभरातील प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि शिक्षणातील वाढते व्यापारीकरण रोखण्यासाठी खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवणारा स्वतंत्र कायदा लागू करण्यात यावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी हा लढा यापुढेही सुरू राहील, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
आंदोलनात अनिकेत बंडू मोरे (जिल्हाध्यक्ष), राजू खरात (महासचिव), कमलेश उभाळे (कल्याण-डोंबिवली शहराध्यक्ष), सुशांत साबळे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















