मुंबई, दि. १५ : मंगेश म्हात्रे
बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित सर्व महानगरपालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी केली.
येथील सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून राबविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होईल, तर उर्वरित २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित अधिसूचना त्या-त्या महानगरपालिका आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात येतील.
सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रातच नव्हे, तर अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही घोषणा किंवा कृती करता येणार नाही, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या तारखा
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान होईल. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी केली जाईल. उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६ असून निवडणूक चिन्हांचे वाटप ३ जानेवारी २०२६ रोजी केले जाईल. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी केली जाईल.




















