ठाणे.दि,६. ( अजय मगरे )
परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक यांच्या पुढाकारातून गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा आज दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करत नृत्य, कला आणि संगीताच्या या भव्य महोत्सवाची उत्साहात सुरुवात करण्यात आली.
या उद्घाटन सोहळ्यास मी, उपमहापौर श्री. कृष्णा दादा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री. आशुतोषजी डुंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सौरभजी राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यंदाचा फेस्टिव्हल ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ या संकल्पनेवर आधारित असून, ढोल-ताशांच्या गजरात व टाळ-मृदुंगाच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिरसात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेने संपूर्ण परिसर भक्तिमय व सांस्कृतिक रंगांनी न्हाऊन निघाला.
आपल्या सर्वांचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फेस्टिव्हलमध्ये उभारण्यात आलेल्या कलादालनाला त्यांचे नाव देण्यात आले, ही बाब उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरली.
ठाण्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा देणाऱ्या या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन नृत्य, कला व संगीताचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन ठाणेकर नागरिकांना करण्यात आले आहे.


















