तब्बल पन्नास वर्षांची प्रतीक्षा संपली; दावरवाडी बाजार मैदानात एस.टी. बस सेवा सुरू
पैठण, दि.२५. (अजय मगरे )
पैठण तालुक्यातील दावरवाडी गावातील नागरिकांची गेल्या अनेक दशकांपासूनची महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. महिन्याच्या दोन्ही एकादशीच्या दिवशी येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस आता थेट दावरवाडी गावातील बाजार मैदानात येणार असल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तब्बल पन्नास वर्षांनंतर हा निर्णय झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी व विद्यार्थी प्रवास करतात. मात्र आतापर्यंत बस गावात न येता बाहेरच थांबत असल्याने नागरिकांना चालत जावे लागणे, खराब रस्त्यांवरून प्रवास करणे तसेच विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी सातत्याने व ठोस पाठपुरावा केला. त्यांनी वेळोवेळी लेखी निवेदने देत प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामस्थांच्या अडचणी, भाविकांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला.
तांगडे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून, यापुढे प्रत्येक एकादशीच्या दिवशी एस.टी. बस थेट दावरवाडी बाजार मैदानात येणार आहे. या निर्णयामुळे दावरवाडी गावासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या किशोर अशोकराव तांगडे यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया – किशोर तांगडे :
“दावरवाडी गावातील नागरिकांची ही अनेक वर्षांची मागणी होती. महिन्याच्या दोन्ही एकादशीच्या दिवशी बस थेट बाजार मैदानात यावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने नागरिकांची गरज ओळखून सकारात्मक निर्णय घेतला, याचे समाधान आहे. हा विजय कोणत्याही व्यक्तीचा नसून दावरवाडी गावातील सर्व नागरिकांचा आहे.



















