कोपरगाव, दि.५ ( दीपक साटोटे )
अहिल्यानगर उत्तर येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीनजी दिनकर यांची तृप्ती देसाई नामक महिलेने विविध प्रसारमाध्यमांतून व समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करून बदनामी केल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टी व अनुसूचित जाती मोर्चाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे लेखी निवेदन देण्यात आले.
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप तुकाराम निरभवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “तृप्ती देसाई यांनी नितीनजी दिनकर यांच्या विरोधात खोटे आरोप करत त्यांची व भाजपाची प्रतिमा मलीन करण्याचा डाव आखला आहे. हे कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्यांची बदनामी थांबवावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.”
भाजप कार्यकर्त्यांनी असा इशाराही दिला की, “जर प्रशासनाकडून याप्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर भारतीय जनता पार्टी व अनुसूचित जाती मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.”
यावेळी निवेदन देताना भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप निरभवणे, उपाध्यक्ष सचिन त्रिभुवन, शहर सरचिटणीस जतीन निरभवणे, तसेच अल्तमाश अनभर साद व साईनाथ जगताप हे कार्यकर्ते उपस्थित होते.




















