कोपरगाव, दि.६ ( दीपक साटोटे )
शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कोपरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने व्यापक उपाययोजना राबविल्या आहेत. आषाढी एकादशी निमित्त वाढणारी यात्रेकरूंची वर्दळ, तसेच मोहरम व गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. कुंभार यांनी स्वतः बसस्थानक परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था तपासली.

शहरातील पाकीटमार, लुटमार, चोऱ्या आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कारवाईचे संकेत देत कुंभार म्हणाले, “गुन्हेगारांना तडीपार करण्याची तयारी केली आहे. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या रोमिओंवर कठोर नजर ठेवली जाईल. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून उपद्रव करणाऱ्यांवरही कारवाई होईल.”
नागरिकांना शासकीय कार्यालयात वेळेवर सेवा मिळावी यासाठीही पोलीस निरीक्षकांनी काही कार्यालयांची पाहणी केली. “शेतकरी, मजूर, महिला कामगार व वकील वर्गासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत. न्याय मिळवताना कोणालाही दबावाला बळी पडू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक सुरळीत राहावी यासाठीही खबरदारी घेतली असून, अपघात टाळण्यासाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रो उशिरापर्यंत उघडी असलेली हॉटेले, चौकात बसून वेळ घालवणारे, व अनधिकृत हालचाली करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
“कोणालाही अभय दिले जाणार नाही. कायदा मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, पोलीस तुमच्या पाठीशी आहे. अन्याय झाल्यास तक्रार नोंदवा, पोलीस तत्पर आहेत,” असे आवाहन कुंभार यांनी केले.
शहरातील कारखाने, दुकाने, बाजारपेठ, तसेच शेतकरी व मजूर वर्गांवर विशेष लक्ष देत शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस सज्ज असून सामाजिक सुरक्षा राखली जाईल,असल्याचे त्यांनी नमूद केले.




















