ठाणे, दि.१३.( अजय मगरे )
आरटीई (RTE) अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. आरटीई अर्ज भरण्याची मुदत शासनाने १८ मार्च २०२६ पर्यंत वाढवली असली, तरी अधिकृत पोर्टलवर अद्याप घरापासून शाळेचे अंतर १ किमीवरून ३ किमी करण्याचा बदल करण्यात आलेला नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळेचे अंतर १ किमीवरून ३ किमी करण्यात आले आहे. मात्र, आरटीईच्या अधिकृत पोर्टलवर (https://student.maharashtra.gov.in�)
हा तांत्रिक बदल अद्याप न झाल्यामुळे पालकांना ३ किमी परिघातील शाळांची निवड करताना अडचणी येत आहेत. परिणामी अनेक पात्र विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांची निवड करता येत नसल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन देत संबंधित तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्याकडे पाठपुरावा करून पोर्टलवरील अंतराचा निकष अद्ययावत करण्याची विनंती करण्यात आली आहे.
यासोबतच ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना ३ किमी अंतराच्या सुधारित नियमाचे काटेकोर पालन करण्याबाबत कडक लेखी सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे. ठाण्यातील वंचित व दुर्बल घटकांतील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




















