भारतीय जनता पार्टीकडून आमरण उपोषणाचा इशारा…
कोपरगाव, दि.२७ ( दिलीप गायकवाड )
कोपरगाव शहरातील आठवडे बाजार व मुख्य रस्त्यांवर बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या रेडीमेड कपड्यांच्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अनु. जाती मोर्चा कोपरगाव शहराध्यक्ष संदीप निरभवणे यांनी कोपरगाव नगरपरिषदेकडे पत्राद्वारे निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

या निवेदनात निरभवणे यांनी नमूद केले की, बाहेरील व्यापाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक व्यावसायिकांना ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. शिवाय, अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे आधीच अडचणीत असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर आणखी परिणाम झाला आहे. त्यांनी मागणी केली आहे की या बाहेरील व्यापाऱ्यांविरोधात तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी अनु.जाती मोर्चाकडून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने पत्राद्वारे उत्तर देताना सांगितले की, संबंधित व्यापाऱ्यांना योग्य समज दिली जाईल व नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. तक्रारदाराने उपोषणाचा मार्ग न अवलंबता सहकार्य करावे, असे आवाहनही पत्रात करण्यात आले आहे.
निरभवणे यांनी या निवेदनाची प्रत पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांनाही देण्यात आली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या समस्यांवर वेळेत तोडगा न निघाल्यास परिसरात व्यापारी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




















