कोपरगांव,दि.२४ : दीपक साटोट
कोपरगांव तालुक्यातील शहर परिसरात आषाढी अमावस्याच्या निमित्ताने भोई समाजातर्फे पारंपरिक दशामाता स्थापना सोहळा उत्साहात पार पडला. कोपरगांव शहरातील भोई समाज महिला मंडळ आणि समाज बांधवांच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राजस्थानमधील जोधपूर, गुजरात आदी राज्यांमध्ये दशामाता मंदिरांची धार्मिक माहिती आढळते. महाराष्ट्रात मात्र गटारी किंवा आषाढ अमावस्येला या दशामातेचे आगमन होत असून, नवरात्र प्रमाणेच दसरा पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
भोई समाजातील महिला व पुरुषांनी वाजतगाजत मिरवणूक काढत दशामातेचे स्वागत केले. नंतर दशामात मूर्तींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील दहा दिवस सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दररोज सकक व संध्याकाळ आरती पुजा, रात्री गरबा, आरती आणि प्रसादाचा कार्यक्रम होत आहे.
दशव्या दिवशी मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने वातावरणात उत्साहाचे रंग भरले आहेत.
या उत्सवात अजय जावोर, संतोष मोरे, आकाश मोरे, रवी साटोटे, निलेश शिवदे, राहुल नंदुरबारे आदी कार्यकर्त्यांनी विशेष सहभाग घेतला.
मुंजोबा चौक, गांधी नगर, कोपरगांव येथे अमर तुकाराम नंदुरबारे यांच्या निवासस्थानी दशामाता मूर्तीची स्थापना करण्यात आली असून, सर्व भोई समाज बांधवांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




















