ठाणे,दि.११.( अजय मगरे )
गुन्हे शाखा घटक-१ ने मोठी कारवाई करत दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ४८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून १ कोटी ३९ लाख रुपये किमतीचे १.०३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
मागील दोन ते तीन वर्षांपासून दिवा पूर्व व मुंब्रा परिसरात बंद घरांचे बाथरूम व खिडक्यांचे ग्रिल उचकटून तसेच मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून घरफोडी करण्याच्या घटना घडत होत्या. या प्रकारच्या अनेक तक्रारी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गुन्हे शाखा घटक-१, ठाणे मागील सहा महिन्यांपासून आरोपीचा शोध घेत होती.
दरम्यान ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिवा पूर्व येथील साई स्वप्न अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाली. या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक संशयित व्यक्ती येताना-जाताना दिसून आला. आरोपीने ओळख लपवण्यासाठी वेगवेगळी वाहतूक साधने वापरली तसेच कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून उलट दिशेने प्रवास केल्याचेही तपासात समोर आले.
तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपास करत शिवाजी गोपाळ संते (वय ३१, रा. टिटवाळा पूर्व, ठाणे) याला २ मार्च २०२६ रोजी टिटवाळा येथून अटक केली. चौकशीत आरोपीने मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत मागील तीन वर्षांत ४८ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपी बंद घरांचे बाथरूम व खिडक्यांचे लोखंडी ग्रील तसेच मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडे लोखंडी रॉडच्या सहाय्याने उचकटून चोरी करत असल्याचे तपासात उघड झाले.
आरोपीकडून चोरीतील १.०३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे १ कोटी ३९ लाख रुपये आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे व त्यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे दिवा-मुंब्रा परिसरातील घरफोडीच्या मालिकेला मोठा आळा बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.




















