पैठण, दि.५ ( अजय मगरे )
भारतीय सैन्यातील ‘ईएमई’ (EME) कोरमधून २४ वर्षांची प्रदीर्घ आणि गौरवशाली देशसेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले हवालदार तबरेजखा आशिफखा पठाण यांचा नांदर ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र खंबीरपणे उभे राहून, आपल्या कर्तव्याची २४ वर्षे निष्ठेने पार पाडणाऱ्या तबरेजखा पठाण यांच्या कार्याचा गावाला अभिमान आहे. त्यांच्या या निवृत्तीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या धाडसी प्रवासाचे कौतुक केले.
याप्रसंगी याकूब पठाण सर, तुळशीराम मगरे सर, शिवाजी मगरे, किरण काळे, समीर पठाण, प्रल्हाद सोनवणे, माऊली काळे, जाफर आतार, नय्युम शेख, अन्सार सय्यद, मुसा आतार, मिठू ननवरे, विजय मगरे आणि रोडगे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी तबरेजखा यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या कर्तव्याची निवृत्तीनंतरची ही दुसरी इनिंगही तेवढ्याच उत्साहाने आणि समाजसेवेसाठी व्यतीत करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.




















